Home > माझ्या लेखणीतून… > माझे विचार . . .

माझे विचार . . .

मी अनुभवलेले क्षण, पळ , प्रहर, मास व वर्षे हे केवळ माझे आणि माझेच संचित आहे जरी ते सामान्य असले तरी त्याची बरोबरी जगात युगात एवढेच नव्हे तर ब्रह्मांडातही कोणाशीच होऊ शकणार नाही. तरी पण आपण स्वतःला सामान्य कां म्हणवून घ्यावे ? हो पण सामान्यानी जर सामान्यच हे बिरुद लावायचे ठरविले तर तो त्यांचा प्रश्न ठरतो. पण हे सर्व मी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नंतरच्या गोष्टी आहेत, मग अगोदरच मी ढेपाळून, मला पूर्णविराम कां देऊ ?

वयाच्या पासष्ठाव्या वर्षी तुम्ही कितीही स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असा पण भोवतालचे जग अगदी तुमच्यापेक्षा वयाने मोठ्यांसकट तुम्हाला निवृत्तांमध्ये ढकलू पहात असतात तेव्हा आपलं मन देखील आपल्या नकळत आत्मपरीक्षण करायला म्हणजेच आपल्या गत क्षणांची गोळाबेरीज करायला सुरु करते व आपल्या गतइतिहासाचे एक मनःचित्र आकार घेते . . . .

द कोलाज . . . .

माझे लहानपण वसईतील दोन खेड्यांमधे गेले. जन्म धुप्पलवाडी येथे व वयाच्या अकराव्या वर्षापासुन ते जे जे च्या शिक्षणापर्यंत तरखड ह्या छोटेखानी पण समृद्ध बालपण देणाऱ्या गावात गेले. आमच्या गांवाला दोनचार ऐतिहासिक पुरुषांची परंपरा तर होतीच पण अव्वल दर्जाची सामान्य नमुनेपण लाभले होते. भाषांतरकार तर्खडकर, चित्तरंजन कोल्हटकरांना आदर्शवत असलेले भाऊ वैद्य सारखे रंगकर्मी, मुंबईत स्वातंत्र्यपूर्व काळापासुन चित्रपट थिएटर व प्रदर्शक व्यवसायात जम बसवणारे गणपतराव वर्तक, ख्रिस्ती प्रार्थनांना मराठीपण व भारतीय संगीताचा साज चढवून क्रांती आणणारे फादर हिलरी फर्नांडिस, धर्म शास्त्र निपूण वासुदेव पंडित, सत्तर वर्षांपूर्वी वसईतालुक्यात जेव्हा सुपरमार्केट ही संज्ञा अस्तित्वात आलेली नव्हती तेव्हा वाण सामानाखेरीज इतर कोणतीही वस्तु हमखास मिळण्याचे एकमेव ठिकाण ‘लक्ष्मी स्टोअर्स ‘ ह्या दुकानाची स्थापना करणारे अण्णा ऊर्फ काशिनाथ पाटिल, आंतरविद्यापिठ व्हाॅलीबाॅल सामन्यामध्ये मुंबई विद्यापिठाच्या व्हाॅलीबाॅल टिम मधुन खेळलेले दिलिप वर्तक तर अलिकडे ज्यांच्या निधनाने आख्खी वसई हळहळली ते सामाजिक कार्यकर्ते सतिश उर्फ नाना वर्तक, अशी उज्वल व्यक्तिमत्वे आमच्या गांवाची शान आहेत. ह्या गांवात, आम्ही कोणालाही हेवा वाटेल असे खरोखरीचे शैशव उपभोगले. खेळांचे दुर्मिळ प्रकार मग ते बैठे किंवा मैदानी असो, तासन् तास प्रचंड मोठ्या विहिरीत पोहणे, होळीत शंभर दिडशे नारळ चोरुन व कोणालाही न कळता झाडावरुन उतरवून खात असू, वाडींमधल्या पपया, ऊस, चिंचा, आंबे, वालाच्या शेंगांची उकड हांडी आणि कोणालाही पत्ता न लावता कोंबड्या पळवून झणझणीत रस्सापावावर ताव मारीत असू, क्रिकेट, व्हाॅलीबाॅल, व्यायामशाळा व वाचनालयासाठी निरनिराळ्या मार्गाने पैसे जमवण्याची धडपड अश्या अनेक उचापतीतील विलक्षण आनंदाचे सोनेरी तरुणपण आम्ही इथेच भोगले.

अश्या नितांत सुंदर गांवातुन गांवढळ पण पौंगवडावस्थेत, जेजे इंन्स्टिट्यूट आॅफ अपलाईड आर्ट अश्या भारदस्त नांव असलेल्या नामांकित कॉलेजमध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली प्रवेश घेतला .

पहिल्याच दिवशी शेजारी अपूर्व बिश्वास ह्या कलकत्यावरुन आलेल्या मुलाशी गाठ पडली ती आजतागायत टिकून आहे, जरी तो प्यरीसमध्ये स्थाईक झालेला असला तरी आज तागायत टिकून आहे, तसेच अरुण ब्रहामनिया, जो नंतर जाहिरात क्षेत्रात नामांकीत ईलस्ट्रेटर म्हणुन प्रसिद्धीला आला, व जेफ फाउलर, जो पंचतंत्र मासिकांसाठी विद्यार्थीदशेपासुनच ईलस्ट्रेशन (चित्र) करीत असे. अश्या इंग्लिश माध्यमातून शिकुन आलेल्या अस्सल शहरी मुलांबरोबर संबंध जुळायला भाषेची अथवा माझ्या गावंढळपणाची अडचण आली नाही हे विशेष भाग्य. नंतर त्यांत सतिश पुळेकरची भर पडली व सतिशमुळे आशा जावळे, नाना पाटेकर, सुनिल राजे, रंजन जोशी, विनय नेवाळकर, संध्या हजारे व अंजली ठाकरे हा कॅन्टीन मधील ग्रुप तयार झाला, तर वर्गात कमळाकर परब, मार्विन परेरा, अजीत खारकर, अरुण वळवईकर, सुनिल सुदामे (ज्याला सतिश छोटे गुलाम अलीखाँ म्हणत असे) अशी भर पडत गेली व ह्या परीवारात माझा खेडवळपणा कसा गळून पडला हे माझे मलाही समजले नाही व माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस पुढे चालू राहिले. पैकी अरुण ब्रहामनिया, जेफ, अपूर्व, सुनिल, मार्विन, अजीत, कमळाकर, अरुण, सतिश व मी एकाच वर्गातला ग्रुप असला तरी. सुदामे व अंजली सोडून बाकी मंडळी आम्हाला एक वर्षाने सीनीयर होती. ह्यात सतिश, सुनिल व मी हे आम्ही तीन्ही ग्रुप मध्ये सामाईक होतो पैकी अजीत, कमळाकर, सुदामे, अरुण वळवईकर, सतीश, सुनिल व मी ह्यांनी फोर्ट मधील इंग्लिश मॉर्निंग सिनेमांचा रतिब लावला होता. अर्थात आमचा म्होरक्या सतीश व तेही योग्यच होते म्हणा, कारण त्याकाळी व त्यावयात वयात देखील तो रंगभूमीशी बांधला गेला होता व नांव मिळवून होता. त्या दरम्यात नटसम्राट हे नाटक गाजत होते व सतीशने त्याचे तेवीस प्रयोग पाहून झाले होते, त्यामुळे त्या नाटककतली स्वगते त्याच्या तोंडुन ऐकणे हा आमचा विरंगुळा होता. रमाकांत देशपांडेसर, सवाईसर व ईर्षाद हश्मीसर सारखे आमचे शिक्षक देखील त्याच्याकडे आदराने बघत आणि हश्मीसर तर केव्हा केव्हा आमच्यात सामीलही होत असत. सतीशमुळे ली व्हॅन क्लिफ, क्लिंट ईस्टवूड, जॉन वेन, रॉक हडसन, अलाय वलाख, रॉर्बर्ट रेडफोर्ड, डेव्हिड नेविन, जॅक लेमन, टोनी करटीस्, सर आँलिव्हर, टेरेंन्स हिल, बर्ट स्पेंन्सर, रिचर्ट बर्टन, गेग्ररी पेक, जीन ह्यकमन, चार्ली चॅपमन, लोरेल हार्डी, रॉबर्ट डि’नेरो, ओमर शेरिफ, कर्क डगलस्, जॅक निकलसन, मार्लन ब्रँडो, डसटिन हॉफमन, जेरी लुईस, पॉल नुमन, स्टिव मॅकविन, पिटर सेलर व ऐन्थनी क्वीन इत्यादि उतुंग हॉलिवूड अभिनेत्यांच्या सिनेमांची ओळख झाली एका अफाट छंद आयुष्यभर जोपासला गेला व जीवनात रंग भरला.

सतीश तेव्हापासुनच रंगभूमीशी जोडला गेलाय. त्या काळात तो एकांकीकाचे दिग्दर्शन करीत असे, मला आठवते कीं बहात्तर साली आय आय टी साठी सतिश ‘व्यासांचा कायाकल्प ‘ ही एकांकीका बसवत होता व आम्ही त्याच्या बरोबर आय आय टि च्या कॅम्पस मध्ये जात असू, अर्थात आमचे आकर्षण म्हणजे तिकडच्या सुंदर हिरवळीवर बसुन बीयर पिणे. सतीशचा तेव्हा सुरु झालेला प्रवास अजुनही चालु आहे, त्यात त्याने काय कमावलं व काय गमावलं ते त्याचे त्यालाच माहीत पण एक नक्की कीं, त्याच्याच बरोबर आणि त्याच्यामुळे सुरु झालेल्या प्रवासात नानाच्या वाटेला आलेले यश मला नटसम्राट सिनेमातील नाना व विक्रम गोखलेच्या रुपात पुन्हा वास्तवात घेऊन गेले.

अनिल ठाकूर
अनिल ठाकूर

जेजे मधील चार वर्षातले शिक्षण म्हणजे माझ्यासाठी अनोखा अनुभव होता. आमचे शिक्षण साचेबद्ध नव्हते. इतर शिक्षणपद्धतीपेक्षा निरनिराळ्या पातळीवर व अनेक तऱ्हेने ते आम्हाला मिळत असे. म्हणजे वर्गात तश्या असाईनमेंट दिल्या जात व विशिष्ट वेळात त्या सबमीटही कराव्या लागत, ही एक सामान्य पद्धत पण केव्हा केव्हा आम्हाला बाहेरच्या ठिकाणी बसुन स्केचींग व लँडस्केपींग करायला घेऊन जात व तिथे आम्हाला शिक्षक मार्गदर्शन करीत असत, त्याचा कळस म्हणजे आमच्या स्टडी टूर्स, जीथे स्केचींग लँडस्केपींग बरोबर शिक्षकांकडून जगाकडे वेगळा पण कलात्मक दृष्टीने बघण्याचा धडा मिळत गेला. आमच्या काॅलेजचे वातावरण अतिशय मुक्त असल्यामूळे कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात शिकण्यासारखे काही ना काही असायचेच, मग जनरल सेक्रेटरी व लेडीज रिप्रेझेटेटीवची निवडणूक असो ऐनव्हल गॅदरींग असो किंवा पिकनीकस् असो काहीतरी कलात्मकतचे दर्शन घडतच असे व आपसुक शिक्षण. कॉलेजच्या निवडणूकी नंतर वर्षभरात अनेक करमणुकीच्या कार्यक्रमात नाटके, शास्त्रीय संगीतापासुन तर संगीत बारी, एॅडव्हरटाईझींग फिल्म शो, चांगले इंग्रजी सिनेमे व आर्ट गॅलरी बघणे असे अनेकविध उपक्रम राबविले जात असत व त्यामागे एकमात्र उद्देश असे कीं विद्यार्थ्यांना कलाविषयक ज्ञान व जाण देणे. त्याकाळात संगीताच्या पेरलेल्या बीजाने माझे आख्खे आयुष्य संगीताने न्हाऊन निघाले. माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मैफिलीची सुरुवातच मुळी कॉलेजमध्ये झालेल्या पं. वसंतराव देशपांडे ह्यांच्या गाण्याने झाली व मी शास्त्रीय संगीता कडे ओढला गेलो, पुढेतर ह्या वेडाने भारतातल्या सर्व अव्वल कलाकारांचे गाणे ऐकण्याचे भाग्य मला लाभले व माझे जीवन समृद्ध झाले. तसेच त्यावयात ऐकलेल्या संगीत बारीमूळे (काळूबाळूचा अस्सल तमाशा) जीवनातल्या प्रत्येक गोष्टींकडे कलात्मक दृष्टीने बघायला शिकवले.

थोडक्यात काय तर माझ्या सारखा एका छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या खेडवळ मुलाला जगात भरलेला आनंद आत्मविश्वासाने उपभोगण्याचे तंत्र केवळ आमच्या जेजेने शिकवले हे उपकार मला सदैव स्मरणात राहीले व राहतील. वरील प्रवासात भेटलेल्या सवंगड्याबरोबर कॉलेजमधले दिवस अत्यंत मजेशीर तर होतेच पण पुढील आयुष्यात देखील आम्ही एकमेकांबरोबर खुप अविस्मरणिय प्रसंग अनुभवले विशेष करुन अपूर्व बिश्वास, सुनिल, नाना व सतिश बरोबरचे. बघु या पुढे त्याविषयीही लिहिता आले तर.

– अनिल ठाकूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *