Friday, January 18, 2019
Home > इतर बातम्या > वसईच्या राजीवली व भोयदापाडा येथे वनविभागाकडून पुन्हा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

वसईच्या राजीवली व भोयदापाडा येथे वनविभागाकडून पुन्हा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

वसई पूर्वेच्या राजीवली व भोयदापाडा येथील वन आणि सरकारी जमिनींवरील अनधिकृत चाळींवर अखेर शुक्रवारी वनविभाग, वसई विरार शहर महानगरपालिका आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे पोलिसांच्या मोठ्या फौजफाटासह हातोडा चालविला.

राजावली येथे वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. वसई पूर्वेच्या महामार्ग आणि इतर गावांमधील वनविभागाच्या जागेवर भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणावार अतिक्रमण केले आणि शेकडो बेकायदा चाळी उभ्या करण्यात आल्या. वसई-विरार महापालिकेने मागील महिन्यात या अनधिकृत चाळींवर कारवाई केले, त्यावेळी मोठय़ा प्रमाणावर दगडफेक करण्यात आली होती त्यासोबतच महापालिकेच्या वाहनाची मोडतोडही करण्यात आली होती. त्यावेळी या अनधिकृत चाळींचे माफिया दारासिंग आणि रंधा सिंग हे फरार झाले आहेत. काल शुक्रवारी झालेल्या तोडक कारवाईत प्रशासनाने सर्वप्रथम या चाळ माफियांचे कार्यालय असलेल्या इमारतीवर पहिला हातोडा चालविला.

वनविभागाने या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना अतिक्रमणे तोडण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. भारतीय वनअधिनियम १९२७ व महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियमाच्या १९७५ च्या कलम ३(१), ३(३) अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या.

पहिली कारवाई २२ मार्च पासून होणार होती. मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने कारावई पुढे ढकलण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातही ऐनवेळी पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही कारवाई रद्द करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली. वनविभागाचे दीडशे कर्मचारी आणि वसई-विरार महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या कारवाईत भाग घेतला. यावेळी पालघर जिल्ह्यातून खास पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपअधीक्षकांसह अडीचशे पोलिसांचा समावेश होता.

याशिवाय राज्य राखीव पोलीस बल आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. अनधिकृत चाळी, बांधकाम सुरू असलेल्या चाळी, भूमाफियांची कार्यालये, प्रार्थनास्थळे आदी जमीनदोस्त करण्यात आली.

अनधिकृत चाळी बांधणारे भूमाफिया फरार झाले असले तर या चाळीत राहणारे सर्वसामान्य लोकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.

त्याचप्रमाणे विरार पूर्व येथील कुंभारपाडा, भातपाडा, नारंगी येथीलही वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामांना वनविभाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *