Sunday, December 16, 2018
Home > ठळक बातम्या > मतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान

मतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान

शरद वारुंगशे पाटील : राज्यातल्या मतदारांनी पोटनिवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. पालघरमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड आणि काही ठिकाणी सकाळच्या वेळेस झालेला खंडित झालेला विद्युत पुरवठा वगळता जिल्हयामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणूकीतील ७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झालंय. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच महाराष्ट्रात व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

पालघर पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट बिघडल्यामुळे वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी जिल्हाधिका-यांनी धुडकावली. मात्र सहा वाजेपर्यंत रांगेत जेवढे मतदार असतील त्यांना मतदान करू दिलं जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक मतदारांना निराश होऊन माघारी जावं लागलं. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात देण्यात आलं होतं. मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आली.

सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४६.५० टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
या मतदार संघात १७ लाख ३१ हजार ७७ मतदार आहेत. यापैकी ९ लाख ७ हजार ४०० पुरुष तर ८ लाख २३ हजार ५९२ स्त्री, इतर ८५ मतदार आहेत.

या पोटनिवडणूकीसाठी पहिल्यांदाच VVPAT मशिनचा वापर करण्यात आला. मतदानास प्रारंभ झाल्यानंतर या मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या संबंधित ठिकाणी तात्काळ नवीन मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु करण्यात आली होती. १५ टक्के मशिन राखिव असल्याने तांत्रिक समस्या निर्माण झालेल्या ठिकाणी तात्काळ मशिन अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सदर समस्येचे निराकरण करण्यात आल्याची ही माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.

पालघर जिल्हयामध्ये दिवसभरात २७६ VVPAT मशिन तांत्रिक कारणास्तव बदलावे लागले तर CU-14 व BU-12 बदलण्यात आले.

पालघर जिल्हयात एकूण २०९७ मतदान केंद्र हेाते तर जिल्हयासाठी २६०८ VVPAT मशिन देण्यात आल्या होत्या. तर २४८० CU BU उपलब्ध करुन देण्यात आले होते. अशी माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.

गुरुवार ३१ मे रोजी सकाळी ८ वाजता गोडाऊन क्र. २, सुर्याकॉलनी येथे मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *