Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > … तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर

… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर

महाराष्ट्राच्या राजकारणात उंदीर मांजराचा खेळ खेळणारे भाजपा आणि शिवसेनेचे सरकार पालघर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. आता उद्या २८ मे ला मतदान असणार आहे, यावेळी पालघर जिल्ह्याचा मतदार राजा कोणाला खासदारकीची भेट देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. दुसरीकडे या पोटनिवडणुकीमुळे कोणामध्ये किती दम आहे हेही लोकांना समजणार आहे.

वसई – विरार – पालघर च्या विकासाबद्दल बोलायचे तर हा विभाग अजूनही दुर्लक्षित असाच आहे. येथील लोकसंख्या जवळपास १७ लाखाच्या आसपास असतानाही मुलभूत समस्यांच्या बाबतीत असजूनही बोंब आहे. येथील रहिवाशी अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करत आहेत. आदिवाशींचे प्रश्नही दुर्लक्षित आहेत. कुपोषणामुळेतर पालघर जिल्हा जागतिक पातळीवर समोर आला. शेतकरी आणि कोळी बांधवांच्या समस्या मंत्रालयाच्या पायर्या झिजवून देखील मार्गी लागण्याच्या कोणत्याही शक्यता धूसर झालेल्या आहेत. जिल्ह्यात काही झाले असेल तर फक्त एक्स्प्रेस हायवे आणि बुलेट ट्रेनची व्यवस्था तेही मोदी सरकारच्या गुजरात प्रेमाच्या माध्यमातून. येथील ‘विकास’ हा स्थानिकांच्या गरजेचा नसून सरकारच्या मार्जीमधलाच झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रे आहेत त्यामधील वसई, बोईसर आणि नालासोपारा विधानसभा क्षेत्रावर बहुजन विकास आघाडी चा दबदबा आहे. डहाणू आणि विक्रमगड भाजपाच्या खिशात आहे. फक्त पालघर विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेने आपली पकड ठेवली आहे. अशा वेळी भाजपा आणि शिवसेनेच्या भांडणामध्ये याचा फायदा जर कोणाला मिळेल तर तो बहुजन विकास आघाडीला. मागील निवडणुकीमध्येही भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यामध्ये फार जास्त मतांचा फरक नव्हता. जर त्यावेळी मोदी लाट अस्तित्वात नसती तर वनगा निवडून येण्याची शक्यता फार कमी असती. परंतु आता वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने आपल्या गळाशी लावून भाजपाला डिवचले आहे आणि सांत्वनाच्या माध्यमातून का होईना परंतु सदर जागा आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. दुसरीकडे भाजपानेही कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असे ठरवले असून त्यांनी वनगा समोर कॉंग्रेस मुक्त भारत म्हणत कॉंग्रेसच्याच राजेंद्र गावित यांना आयात करून कांटे की टक्कर देण्याचा चंग बांधला आहे. कॉंग्रेसही या खेळामध्ये मागे नसून त्यांनी दामोदर शिंगाडा यांना उमेदवारी देवून टाकली आहे. पण या सर्वांमध्ये बहुजन विकास आघाडीच किंगमेकर ठरणार आहे. शिवसेना – भाजपा यांच्या भांडणामध्ये बाविआ याचा पूर्ण फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *