Friday, January 18, 2019
Home > गुन्हे - Crime > खंडणी प्रकरण : धनंजय गावडे, गोविंद गुंजाळकर यांच्यावर अजून एक-एक गुन्हे दाखल, माहिती कार्यकर्ता संजय कदमसह अन्य दोघांना अटक

खंडणी प्रकरण : धनंजय गावडे, गोविंद गुंजाळकर यांच्यावर अजून एक-एक गुन्हे दाखल, माहिती कार्यकर्ता संजय कदमसह अन्य दोघांना अटक

माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांची माहिती मागवून खंडणी उकळण्याच्या प्रकरणात पालघर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद गुंजाळकर यांच्यावर अजून एक-एक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर माहिती अधिकार कार्यकर्ता संजय कदम याच्यावरही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

वसई विरारमध्ये माहिती अधिकाराचा वापर करून तर कधी सत्तेचा वापर करून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागण्याचे प्रसंगी जीवे ठार मारण्याचे प्रकरण वाढले आहे. याबाबत पालघर पोलिसांनी विभागातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, या पक्षाच्या बड्या पदाधिकारी व माहिती कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटक सत्र सुरु केल्यावर तसेच पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी केलेल्या आवाहनानंतर इतर पिडीत बांधकाम व्यावसायिकांनी अशा लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री आणखी चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंद गुंजाळकर, शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे, माहिती अधिकार कार्यकर्त संजय कदम यांचा समावेश आहे. दोन दिवसांत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या आठ झाली असून, एकूण २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आणखी दोघांना अटक करण्यात आली.

कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही ही कारवाई सुरू केली आहे. यापुढेही आलेल्या तक्रारींची शहानिशा करून गुन्हे दाखल केले जातील.

– मंजुनाथ सिंगे, पोलीस अधीक्षक, पालघर

शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर चौथा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक संजय साळुंखे यांच्या चंद्रपाडा येथील बांधकामाविरोधात तक्रार करू नये यासाठी १० लाखांची खंडणी मागितली आरोप आहे. या प्रकरणात गावडे याच्यासह अशोक दुबे, राजेश दुबे, अरिजित यादव या चौघांवर खंडणीचे आणि शस्त्राचा धाक दाखविल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राजेश दुबे आणि अरिजित यादव यांना पोलिसांनी अटकही केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद गुंजाळकर याच्यावर वसई पोलीस ठाण्यात एक कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीब के इन्फ्राटेक या कंपनीचे मालक शमशुद्दीन खान यांच्या शिवणसई येथील औद्योगिक बांधकामांची तक्रार करू नये यासाठी ही खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील गुंजाळकर याच्या एका साथीदाराचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहिती अधिकार कार्यकर्ता संजय कदम याच्यावरही वसई पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात कदम यांनी मालोंडे येथील बांधकाम व्यावसायिक खलीद शेख यांच्या आयेशा मेन्शन या अनधिकृत इमारतीविरोधात तक्रार न करण्यासाठी साडेपाच लाख रुपये मागितले होते. त्यापैकी ५० हजारांची रक्कम स्वीकारली होती. तर दुसऱ्या प्रकरणात मॅक्सवेल मिस्किटा यांच्या इमॅन्युएल टॉवर या इमारतीवर कारवाई करू नये यासाठी कदम यांनी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *