Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > धनंजय गावडेवर खंडणीचा सहावा तर गोविंदा गुंजाळकरवर तिसरा गुन्हा दाखल, भाजपाचा अरुण सिंग याच्यासह एकाला अटक

धनंजय गावडेवर खंडणीचा सहावा तर गोविंदा गुंजाळकरवर तिसरा गुन्हा दाखल, भाजपाचा अरुण सिंग याच्यासह एकाला अटक

पालघर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर वसई विरार मधील खंडणीखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढला आहे. शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची संख्या सहा वर पोहोचली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात विकासकाकडून दहा लाखांची खंडणी मागितल्याचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यामध्ये एका हॉटेल व्यावसायिकाला अटक केली आहे. गेल्या काही दिवासात पोलिसांनी तब्बल १५ खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत.

शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वसई विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी याबाबत तक्रार दिली होती. २०१५ मध्ये पाटील यांनी बांधकाम केलेल्या नाना नानी पार्क बाबत तक्रारी न करण्यासाठी आरोपी गावडे आणि त्यांचा साथीदार नरेश कापडिया यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी दिली. यापैकी दहा लाख रुपये कापडीया याने स्विकारले असल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. ‘माहितीच्या अधिकाराखाली तुमच्या जागेबाबत माहिती प्राप्त केली आहे. त्या माहिती व कागदपत्रांच्या आधारे तुम्हाला अडचणीत आणीन,’ असे धमकावून गावडेने ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली व कोणाकडे वाच्यता केल्यास तुमच्या जीवाचे बरे वाईट करू, अशी धमकी दिल्याची तक्रार पाटील यांनी विरार पोलीस ठाण्यात केली आहे. विरार पोलिसांनी या प्रकरणी धनंजय गावडे आणि कापडीया यांच्यावर खंडणी मागून धमकी दिल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

दुसऱ्या एका प्रकरणात गावडे विरोधात नालासोपाऱ्यातील तुळींज पोलिस ठाण्यात गुरुवारी आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार विरार येथील बिल्डर निशाद चोरघे यांनी दिली आहे. चोरघे यांच्या  मे. मनीगोविंद डेव्हलपर्स नावाची भागिदारी संस्थेमार्फत विरार येथील गोविंद हाइट्स नावाच्या इमारतीच्या बांधकामविरोधात अरुण सिंग याने पालिकेत माहिती अधिकाराच्या आधारे अर्ज करून माहिती मिळवली. जानेवारी २०१५ मध्ये धनंजय गावडे याने चोरघेला भेटायला बोलावले व बांधकामाविरोधात तक्रार करणारा अरुण सिंग हा त्याचा साथीदार आहे, असे सांगून बांधकाम वाचवायचे असेल तर ५० लाख रुपये दे, तू पैसे दिले नाहीस तर तुला १० वर्षांसाठी तुरूंगात पाठवू, असे धमकावले. धनंजय गावडे, अरुण सिंग यांनी आपसात संगनमत करून राधाकृष्ण हॉटेल येथे १० लाख रुपये खंडणीपोटी स्वीकारले व स्वीकारलेली रक्कम राधाकृष्ण हॉटेलचा मॅनेजर कल्पेश राठोड याचेकडे दिली. या प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी अरुण सिंग व राधाकृष्ण हॉटेलचा मॅनेजर कल्पेश राठोड यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामुळे गावडे यांच्यावरील एकूण खंडणीच्या गुन्ह्यांची संख्या सहा झाली आहे.

विरार येथील इम्तियाज शेख या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पूर्वेतील भूमापन क्रमांक १८७ मधील ३ गुंठे जमिनीवर या शेख यांच्या ४ मजली इमारतीचे काम सुरू होते. गोविंदा गुंजाळकर याने राष्ट्रवादीचे आमदार आंनद ठाकूर यांच्या नावाने तक्रार अर्ज विविध विभागांना केले होते. एप्रिल २०१६ मध्ये शेख यांना वसई पश्चिमेतील कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले होते. या वेळी शेखला, तुझे बांधकाम वाचवायचे असेल तर मला १० लाख रूपये दे. याबाबत कोणाकडे तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी गुंजाळकर याने दिली होती. यानंतर त्याने दोन लाख रुपयांची खंडणी स्वीकारली त्याने होती. याबाबत शेख यांनी तक्रार दिल्यानंतर वसई पोलीस ठाण्यात गुंजाळकर विरोधात कमल ३८४, ३८६ प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुंजाळकर यांच्याविरोधात याआधी नालासोपारा पोलीस ठाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा तसेच वसई पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाकडून एक कोटींची खंडणी मागून ५ लाख रूपयांची खंडणी स्वीकारल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. यानंतर गुंजाळकरावरील खंडणीच्या गुन्ह्यंची संख्या आता तीन झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *