Sunday, December 16, 2018
Home > गुन्हे - Crime > वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव खंडणी प्रकरणी अटक

वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव खंडणी प्रकरणी अटक

वसई- वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्यांच्यासह आणखी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांनी वादग्रस्त शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

याबाबत माहिती अशी की, विरार पूर्व मधील मनवेलपाडा येथील सर्व्हे नं १४३ हा भूखंड साई रिदम बिल्डर्स आणि डेव्हलपर्सने विकसित करण्यासाठी घेतला होता. ह्या बांधकामावर तक्रारदार धर्मेश गांधी हे देखरेख करीत होते. या बांधकामात अनियमितता असून याबाबत नितीन मधुसूदन राऊत (रा. विरार) यांनी पालिकेकडे तक्रार नोंदवली आहे, अशी माहिती प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी धर्मेश गांधी यांना दिली. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१६ ते २८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान बांधकामांवरील कारवाई टाळण्यासाठी २५ लाखांची खंडणी देण्याचा तगादा जाधव यांनी लावला अखेर खंडणीच्या रकमेतील ५ लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम जेव्हा जाधव यांनी स्वीकारली तेव्हा त्यांच्या कार्यालयात दोन अनोळखी व्यक्ती उपस्थित होते त्या माणसांना दाखवून ते म्हणाले, “ही धनंजय गावडेची माणसे आहेत, उर्वरित रक्कम न दिल्यास ते तुमच्या जीवाचे बरे वाईट करतील, तेव्हा उर्वरित रक्कम लवकरच आणून द्या.” असे धमकावले, अखेर गांधी यांनी जाधव यांच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याची गंभीर दखल घेत प्रेमसिंग जाधव आणि अन्य दोघांविरोधात  पोलिसांनी ३८४, ३८६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. तसेच यातील इतर दोन अनोळखी इसमांचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान वसई-विरार क्षेत्रात खंडणीच्या गुन्ह्यांचे सत्र सुरुच असून ३१ मार्चपासून आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्हे दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *