
राज्यातील देवरिया जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. महिलेच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात आली मात्र तितक्यात महिला पुन्हा जिवंत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोरखपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. त्यानंतर कुटुंबीय महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेत होते. तर, एकीकडे घरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. तर, अत्यंदर्शनासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती. मात्र, त्याचवेळी रस्त्यात अचानक महिलेचा श्वास सुरु झाला. अचानक मृत महिलेचा श्वास सुरू झाल्यानंतर कुटुंबियांना एकच धक्का बसला. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका पुन्हा देवरियातील रुग्णालयात नेली. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी करुन ती ठणठणीत असल्याचं म्हटलं आहे. ही वार्ता समजताच स्मशानशांतता पसरलेल्या घरात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
महुआडीह ठाणे क्षेत्रातील रहिवाशी मीना देवी यांच्यावर गोरखपुर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. शुक्रवारी डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर ती गंभीर असल्याचं म्हटलं होतं. नंतर, काही वेळानं त्यांचं निधन झाल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. रुग्णालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला. महिलेचे निधन झाल्याचं कळताच नातेवाईक घरी पोहोचले. अत्यंसंस्काराची तयारीही सुरू करण्यात आली होती.
महिलेचा मृतदेह घरी घेऊन येत असताना रस्त्यातच महिला श्वास घेत असल्याचं लक्षात आलं. अचानक महिलेचे श्वास चालु झाल्यानं सगळेच हैराण झाले. त्यानंतर तातडीने डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही वेळातच तिची स्थीती सुधारली व ती बोलूही लागली. डॉक्टरांनी पुन्हा एकदा तिची तपासणी केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.