
भारतानं गुलामगिरीचं एक चिन्ह आपल्या छातीवरून उतरवलं, आजपासून भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आत्तापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं. पण आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल. आज मी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत भारतीयत्वाच्या भावनेनं भारलेला नवा ध्वज भारतीय नौदलाच्या आत्मसन्मान आणि आत्मसामर्थ्याला नवी ऊर्जा देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कार्यक्रमाला संदेश देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि स्वर्णीम असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशाली, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा आणि मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.