
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि बाळसाहेबांची शिवसेना यांची युती असणार आहे. राज्यात ती सगळीकडेच आहे. राष्ट्रवादी एक नंबर का आमचा पक्ष एक नंबर हे जनता ठरवत असते. आमचा लोकांना उद्योग सोयी सुविधा देण्यावर भर आहे. त्यामुळे याचा फायदा लोकांना होत आहे. साता-यातील कॉरिडॉर मध्येच ५०० एकराचं अॅग्रो इंडस्ट्रियल पार्क उभं करणार असून स्थानिक लोकांनाच याचा फायदा होणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्या पक्षाचा विस्तार आणि इनकमिंग जोरदार सुरु आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. करोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आधीच्या सरकारनं घेतला होता. मात्र, पैसे आम्ही भागवले आहे. आम्ही कोणालाही वंचित ठेवणार नाही. तसंच पक्षाचा विस्तार आणि पक्षाचं इनकमिंग जोरदार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. चक्का जाम आंदोलनाबाबत राजू शेट्टी यांच्या सोबत बोलणं झालं असून २९ तारखेला त्यांच्या सोबत बैठक ठेवली असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
आमच्या मनगटावर आमचा विश्वास आहे कोणाला हात दाखवण्याची गरज नाही, आम्ही लपून छपून दर्शनाला जात नाही. अघोरी प्रथेवर विश्वास ठेवणाऱ्यांचा शेवटसुद्धा अघोरीच होतो, या संजय राऊत यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. आम्हाला हात दाखवण्याची आवश्यकता नसून परिस्थिती बदलण्याची ताकद मनगटात असावी लागते. बाळसाहेबांनी आणि दिघे साहेबांनी आम्हाला बळ दिलं असून ३० जूनला आम्ही ते दाखवून दिलंय. आमच्या आत्मविश्वासावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. तसंच दर्शन करायला मी जाहीरपणे जातो काही लोकं लपून छपून जातात, त्यांना तुम्ही विचारा असं उत्तर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
दक्षिण सोलापूर मधील सीमावर्ती भागातील प्रश्नांवर शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील लक्ष देणार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दक्षिण सोलापूर मधील सीमावर्ती भागातील तालुक्यामध्ये कन्नड माध्यमातून शाळा चालवल्या जात आहेत.या शाळा सोलापूर जिल्हा परिषद चालवत आहे. याकडे प्रकर्षानं लक्ष दिलं जाईल. सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी दोन मंत्री आम्ही नेमले असून शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील या प्रश्नाकडं लक्ष देतील. तसंच आमचे ५ मंत्री समिती मध्ये आहेत. या कडं पूर्णपणे लक्ष दिलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलं आहे.