‘इंडिया बुल्स’च्या अनधिकृत कॉल सेंटरवर सातपाटी सागरी पोलिसांचा छापा

सातपाटी सागरी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या पाम गावाच्या हद्दीतील एका इमारतीतील इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स च्या अनधिकृत कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून चारजणांना ताब्यात घेतले आहे. हे चारही आरोपी आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, १४ मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले.

पालघर जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आउटअंतर्गत राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये पाम येथील इमारतीत संशयित नागरिक राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर सातपाटी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी वृंदावन सोसायटीच्या इमारतीमधील खोली क्र. १०३ मध्ये छापा टाकला. यावेळी चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या अनधिकृत कॉल सेंटरमधून इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे सांगून ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत असे. व्हाॅटस्ॲपद्वारे इंडियाबुल्स कन्झ्युमर फायनान्सचे बनावट कर्जाचे फॉर्म ग्राहकांना पाठवण्यात येत होते. त्यांच्याकडून माहिती घेण्यात आल्यावर ग्राहकांना कर्ज मंजूर झाल्याबाबत कंपनीचे लेटर पाठवून कर्ज मिळवून देण्याची प्रोसेस फी म्हणून इन्शुरन्स टीडीएस जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांकडून फोन पे, गुगल पेवरून पैसे स्वीकारले जात व  त्यांची फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पोलिस निरीक्षक अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, सातपाटी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  उपनिरीक्षक महेश अंबाजी, पो. ना. भारत सानप, पो. शि. गणेश वस्कोटी यांनी ही कारवाई पार पाडली. “,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *