
गुजरात विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. यंदा गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्य मतदान होणार आहे. पहिला टप्पा 1 आणि दुसरा टप्पा 5 डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही 8 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत. त्यातच आता महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या आमदार संगीता पाटील तिसऱ्यांदा गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत.
आमदार संगीता राजेंद्र पाटील यांचे माहेर हे खान्देशच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रुक हे गाव आहे. सुरतमधील लिंबायत मतदार संघातून त्या तिसऱ्यांदा आपले नशीब आजमवणार आहेत. पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रूक प्रभ या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांना दोन बहिणीही असून दोन्ही विवाहीत आहेत. आमदार संगीता पाटील याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. गुजरात विधानसभेत आतापर्यंत त्या दोनवेळा भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
आता पक्षाने त्यांना पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा तिकीट देऊन लिंबायत या त्यांच्या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आमदार संगीता पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचे गोपाल पाटील यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्या हॅटट्रिक मारुन पुन्हा गुजरात विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश करणार का, याकडे सर्व खान्देशवासियांचेही लक्ष लागले आहे.
विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी दोन टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. पाच वर्षांपूर्वी अत्यंत चुरशीच्या झालेल्या गुजरात निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या आणि प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्रसिंह चुडासामा, प्रदिपसिंह जडेजा या इतर दोन ज्येष्ठ नेत्यांनी ते आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे जाहीर केले आहे.