गुवाहाटी दौऱ्याला शिंदे गटातील सहा आमदारांची दांडी
राज्यात यशस्वी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. याठिकाणी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडू दे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीला नवस केल्याची चर्चा आहे. हा नवस फेडण्यासाठीच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला गेल्याचे सांगितले जाते.
एकनाथ शिंदे यांनी या चर्चा फेटाळाल्या असल्या तरी त्यांच्या गटातील इतर आमदारांनी कोणताही आडपडदा न बाळगता आमचे हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आहे, नवस फेडणे आमच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यामुळे फक्त कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले आहे. मात्र, शिंदे गटाच्या या गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराने दांडी मारल्याचे समोर आले आहे.

यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. मतदारसंघातील पूर्वनियोजित कामांमुळे आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे संबंधित आमदारांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी शिंदे गटासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील भाजपचे दोन नेते मंत्री रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज सोबत आहेत.

आज सकाळी ९.३० वाजता शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांसह गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले. यानिमित्ताने मुंबई विमानतळावर दाखल होत असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये सध्या चांगलाच उत्साह दिसत होता. गेल्या काही दिवसांमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धार्मिक दौरे हे सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच त्यांनी नाशिकमध्ये एका ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्याची चर्चा होती.
एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी गुवाहाटीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा स्वत: विमानतळावर जाऊन एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणार आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच्या स्वागतासाठी गुवाहाटी विमानतळावर लाल पायघड्या घालण्यात आल्या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना हॉटेल आणि कामाख्या मंदिरात जाण्यासाठी विमानतळावर आसाम सरकारकडून खास बसेसची सोय करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *