चेन्नईमध्ये मृतदेहावर बलात्कार करणाऱ्याला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अटक

चेन्नईत मागील आठवड्यात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या हत्येप्रकरणी फरार असणाऱ्या आरोपीला पकडण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. आरोपी राजू नायर याला शुक्रवारी पकडून तपास व चौकशीसाठी कोणामल्ली पोलिस ठाण्यातील पोलिस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चेन्नईच्या आवडी पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोणामल्ली पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील आठवड्यात शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तो विरार परिसरात कोठेतरी राहत असल्याची माहिती घेऊन आलेल्या तपास टीमने विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांकडे मदत मागितली. त्यानुसार गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या पथकासोबत विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी आरोपी हा फुलपाडा परिसरातील सुजाता अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, सहायक फौजदार सुरेंद्र शिवदे, अंमलदार सागर घुगरकर, युवराज वाघमोडे, सुनील पाटील यांनी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. आरोपीचे ट्रान्झिट वॉरंट वसई न्यायालय येथून घेऊन चेन्नई पोलिस आरोपीला घेऊन गेल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *