जजसाहेब, ५८१ किलो गांजा उंदरांनी खाल्ला! पोलिसांचं अजब उत्तर; न्यायाधीशांकडून ‘कामाचा’ सल्ला
मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे एक अजब घटना घडली आहे. मथुरा पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवण्यात आलेला ५८१ किलो गांजा उंदरांनी फस्त केला. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात याचा उल्लेख आहे. मथुरा पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया करून ५८१ किलो गांजा जप्त केला होता. पोलीस ठाण्यात असलेल्या साठवणूक गृहात गांजा ठेवण्यात आला होता.गांजा जप्त आणि फस्त प्रकरण शेरगढ आणि हायवे पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. उंदरांनी ५८१ किलो गांजा संपवल्याचं प्रकरण सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. शेरगढ आणि हायवे पोलिसांनी २०१८ मध्ये ३८६ आणि १९५ किलो गांजा जप्त केला होता. काही गुन्हेगारांनाही अटक केली. पोलिसांनी पुरावा म्हणून गांज्याचे नमुने न्यायालयात सादर केले.

जप्त करण्यात आलेला सगळा गांजा न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सप्तम संजय चौधरींनी पोलिसांना दिले. त्यावर पोलिसांकडून अजब उत्तर देण्यात आलं. जप्त केलेला सगळा गांजा उंदरांनी फस्त केल्याचं पोलिसांनी एका अहवालाच्या माध्यमातून न्यायालयाला सांगितलं. सगळा गांजा उंदरांनी फस्त केल्यामुळे तो न्यायालयात सादर केला जाऊ शकत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

उंदरांपासून बचाव करता येईल, अशी एकही जागा भंडारगृहात नसल्याचं मथुरा पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. जवळपास सगळाच गांजा उंदरांनी खाल्ला. थोडासा राहिला तो आम्ही नष्ट करून टाकला, असं पोलिसांनी अहवालात म्हटलं. यावरून न्यायमूर्तींनी पोलिसांना काळजीचा सल्ला दिला. पोलीस ठाण्यात आणि साठवणुकीच्या खोलीत उंदीर पोहोचणार नाहीत याची व्यवस्था करा, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *