
काही दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ज्यातिषाकडे जाऊन भविष्य पाहिल्याच्या बातमीने मोठा गोंधळ उडाला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.
संविधान आज सुरक्षित आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. लोकशाही वाचवण्याच्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे. काहीजण चाळी रेडे घेऊन काहीजण गुवाहटीला गेले आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी चाळीस आमदारांना लगावला आहे.
गेल्या आठवड्य़ात गेले स्वत:चं हात दाखवायला. ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाही. तो आपलं भविष्य ठरवणार. तुमच्या हाताची सफाई सर्वांना माहिती आहे. तुमचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
जुने होते ते फरवे होते, गद्दार निघाले. मी नव्या जोशाने उभा आहे, पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. भाजप हा आयात पक्ष झाला आहे. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार आहे? यांच्या पक्षात आयात केलेले नेते आहेत. भाजप भाकड पक्ष आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
दरम्यान, तुमच्या काळी टोपीपर्यंत काय दडलंय त्याचा मान मी राखू शकत नाही. जर तुम्ही आमच्या महाराजांचा अपमान करणार असाल तर तुमचं वय कितीही असेल… तुम्ही तुमच्या घरामध्ये बसा. आमच्या दैवतांबद्दल खपवून घेणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महिलेचा अपमान होत असताना तुम्ही काहीही करत नाही. वाघ आहात की गांडूळ आहात?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.