ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुखावर हल्ला, चौघांना अटक, जिल्हाप्रमुखावर संशय
वाशिम : शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश मापारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेले असता, ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे अकोला येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र त्यांचे दोन भाचे व अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलीस उपविभागीय अधिकारी पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या नव्यानेच नियुक्त झालेल्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या आसपास भर दिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर वाशिमच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला हलविण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या पोटात व छातीत चाकू हल्ल्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. हल्ल्यात बचाव करताना त्यांच्या हाताच्या नसाही कापल्या गेल्या होत्या.

दरम्यान या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला मदत करणाऱ्या अब्दुल जुबेर अब्दुल जब्बार, अब्दुल वाजीद उर्फ गोऱ्या या दोन आरोपींना अटक केली होती, त्यांच्या चौकशीतून जिल्हाप्रमुख सुरेश मापारी त्यांचे भाचे नितीन कावरखे, भगवान शंकर वाकुडकर, यांचे नावं समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. तर जिल्हाप्रमुख सुरेश मापारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मात्र प्रत्यक्ष हल्ला करणारा मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.

रंजना पौळकर यांनी याआधीच २६ सप्टेंबरच्या आसपास शहर पोलीस स्टेशन वाशिम येथे त्यांच्या जिवाला धोका असल्याची तक्रार जिल्हाप्रमुख सुरेश मापरीची निकटवर्तीया विरुद्ध नावानिशी दिली होती. मात्र शहर पोलीस स्टेशन कडून अदखलपात्र तक्रार नोंदवून पौळकर यांची फक्त बोळवण करण्यात आली होती. त्या तक्रारीचा व आत्ता झालेल्या हल्ल्याचा काही सबंध आहे का याचाही पोलिस करत आहेत. त्यासाठीच मापारी यांच्या दोन भाच्यांनाही पोलिसांनी त्याब्यात घेतल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *