
तालुक्यात समुद्रकिनारी रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी नंबरप्लेट नसलेल्या भंगारातील वाहनांचा तसेच गुजरातमधील नंबरप्लेटच्या वाहनांचा वापर केला जात आहे. या बेकायदा धंद्याला वेळीच रोखण्यात सुरक्षा यंत्रणांना अपयश आल्याने आरटीओ आणि पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
डहाणूच्या तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वीच रेतीउपसा करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीवर कारवाई केली होती. ही चारचाकी गाडी गुजरात पासिंगची असल्याची नंबरप्लेट त्यावर होती. रेतीचोरीसाठी जुन्या वाहनांची खरेदी करून ती नंबरप्लेटशिवाय चालवली जात असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्याशिवाय, काही वाहनांवर गुजरात पासिंगची नंबरप्लेट असल्याचेही सांगितले जात होते. तहसीलदारांच्या कारवाईमध्ये समोर आलेल्या माहितीमुळे या शक्यतांना पुष्टी मिळाली आहे.
अवैध रेतीचोरीवरील कारवाईत वाहन जप्त झाल्यास, त्याआधारे पोलिस चोरट्यांपर्यंत पोहोचतात. त्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाईला सामोरे जावे लागते. वाहन सोडवण्यासाठी हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. त्यामुळे तपास तपासयंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी भंगारातील वाहने खरेदी करून नंबरप्लेटशिवाय किंवा गुजरात पासिंगची नंबरप्लेट लावण्याची शक्कल लढवली जात आहे.
बांधकाम व्यवसाय तेजीत आल्यानंतर अनेक तस्करांनी रेतीव्यवसायात शिरकाव केला. त्यांना काही सरकारी कर्मचाऱ्यांचा वरदहस्त लाभल्याने या व्यवसायात माफियाराज सुरू झाले. पूर्वी सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात रेती भरून सुरूच्या बागेत उभ्या असलेल्या व्हॅनमध्ये पोती भरली जायची. आता वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी थेट चौपाटीवर वाहने उभी करून रेतीचोरी होते. विविध गावांच्या किनाऱ्यावर रात्री आठ ते पहाटे पाच या काळात अवैध रेती उपशासाठी स्पर्धा असते. थोड्या कालावधीत अधिक पैसा मिळतो, शिवाय अपवादानेच कारवाई होत असल्याने अल्पावधीतच तस्करांची संख्या वाढली आहे. त्यामुळे व्हॅनऐवजी पीकअप वाहनांचा वापर सुरू झाला आहे. या प्रकाराने आरटीओ आणि पोलिसांसमोर नवे आव्हान उभे केले आहे. या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याची किंमत सुरक्षा यंत्रणेलाच मोजावी लागणार आहे.