नांदेड-लातूरचे परंपरागत राजकीय वितुष्ट ‘भारत जोडो’मध्येही कायम  

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण झाला आहे. आता ही यात्रा मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. महाराष्ट्रात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेदरम्यान नांदेड आणि लातूरकरांचे (Nanded-Latur) परंपरागत राजकीय वितुष्ट अद्यापही कायम असल्याचे दिसले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही नांदेडकर आणि लातूरकर एकमेकांपासून दूर असल्याचे पाहायला मिळाले.

भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातून सुरुवात झाली होती. पुढे ही यात्रा हिंगोली, वाशीम बुलढाणा जिल्ह्यात गेली. नांदेडच्या यात्रेची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर होती तर हिंगोलीत राजीव सातव यांच्या निधनानंतर पक्ष संघटना तितकीशी मजबूत नसल्यामुळं लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्यावर हिंगोलीची जबाबदारी देण्यात आली होती.

नांदेडमध्ये राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा झाली. या सभेला राज्यातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमासाठी काँग्रेसमधील एक वजनदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र व माजी मंत्री अमित देशमुख यांना निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळेच अमित देशमुख यांची इच्छा असूनही राहुल गांधींच्या पहिल्या सभेला त्यांना उपस्थित राहता आले नाही.

हिंगोलीच्या चार दिवसांच्या यात्रेची जबाबदारी पक्षाने अमित देशमुख यांच्यावर दिली होती. या यात्रेचे नियोजन करण्यात ते व्यस्त होते. नांदेडच्या यात्रेची याबद्दलचा चर्चा महाराष्ट्रभर झाली त्याच धर्तीवर हिंगोलीचे नियोजन व्हावे, असा प्रयत्न अमित देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांचा होता. विलासराव देशमुख हे शंकरराव चव्हाण यांचे जवळचे मानले जात होते. त्यांची महाराष्ट्रभर तशी ओळख होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हाच अशोक चव्हाण यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा निर्माण झाली होती. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर पुन्हा विलासराव मुख्यमंत्री झाले. दुसऱ्यांदा विलासराव देशमुख यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाला द्यायची याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्यासाठी शब्द टाकला होता.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यात विविध मुद्यावरुन आकस वाढला. त्यात आयुक्तालयाचा वाद सुरू झाला. विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक प्रताप पाटील चिखलीकर हे कायम लोहा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत होते. ते अपक्ष म्हणून निवडून येत असत. विलासरावांच्या निधनानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर चव्हाण आणि देशमुख यांच्यातील राजकीय दरी वाढतच गेली. आमच्यात मतभेद नाहीत असे दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यात तथ्य नसल्याचे सिद्ध होत गेले. दरम्यान भारत जोडो निमित्ताने अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्यातील वितुष्ठ दिसले. सध्या विळ्याची भूमिका अशोक चव्हाणांची आहे तर भोपळ्याची भूमिका लातूरच्या देशमुखांची असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *