
पालघर जिल्ह्यात प्रथम जव्हार भागात भूकंपाचे धक्के जाणवत होते. परंतु गेली पाच वर्ष म्हणजेच २०१८ पासून या भागामध्ये भूकंपाचे मध्यम व सौम्य धक्के बसण्याच्या घटना प्रत्येक वर्षी किमान चार-पाच वेळा तरी घडत आहेत. यामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्याची संख्या खूप कमी असून त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या संख्या अधिक आढळून आले आहेत.
गेल्या वर्ष-दीड वर्षापासून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. परंतु ऐन थंडीत बुधवारी पहाटे बसलेल्या या मध्यम स्वरुपाच्या धक्क्यामुळे तलासरी व डहाणू तालुक्यातील नागरिक भीतीने खडबडून जागे झाले व सकाळपर्यंत लहान मूलं, वयस्कर यासह तरुण व मध्यम वयातील असे सर्वच जण आपल्या अंगणात बसून राहिले होते.
जिल्ह्यात गेली पाच सहा वर्षे सातत्याने बसणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने सुचवलेल्या उपाय योजनाकडे जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि भूकंप विरोधी व्यवस्थापन विभाग मात्र भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता आणि सातत्य कमी झाल्याने भूकंप व्यवस्थापन तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत असून नागरिक त्याबाबत संताप व्यक्त करत आहेत.