पालघर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या ५० टक्क्यांनी तर वसई विरार महापालिका क्षेत्रात ३० टक्क्यांनी घटली

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णसंख्या ५० टक्क्यांनी, तर वसई विरार महापालिका क्षेत्रात ३० टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले आहे. मागील आठवड्यात ग्रामीण भागात करोनाचे ९६ रुग्ण होते, या आठवड्यात हा आकडा घटून ५२ झाला आहे. तर विरार वसई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये मागील आठवड्यात रुग्णसंख्या २१७ वरून १४२ घटली आहे.

पालघर जिल्ह्यात आठवडाभरात १९४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४२ विरार वसई महापालिका क्षेत्रात असून ५२ पालघर ग्रामीण विभागात आहेत. त्यामध्ये डहाणू तालुक्यात २३ आणि पालघर तालुक्यात २१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. जिल्ह्यात पन्नास रुग्ण घरी उपचार घेत असून दोन रुग्णांवर समर्पित कोविड रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत.

जिल्ह्यात १६ मेपासून आतापर्यंत दहा करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण वसई-विरार महापालिकेतले आहेत. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण ०.३, तर वसई-विरार महापालिकेत ०.४ टक्के आहे. या कालावधीत जिल्ह्यात ग्रामीण भागात आठ हजार २१६, तर वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये ४७ हजार ८०२ अशा एकूण ५६ हजार १८ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात करोनाबाधितांचा दर ग्रामीण भागात सात टक्के, तर वसई विरार महापालिकेमध्ये पाच टक्के आहे. या कालावधीत रुग्ण पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात ९०.५ टक्के, तर वसई विरार महापालिका क्षेत्रात ९४.३ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *