प्रारूप मतदारयाद्यांवर ५ हजार हरकती

वसई- विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांवर वसई-विरारमधून एकूण पाच हजार आठ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक दोन हजार ९२३ हरकती नालासोपारा पूर्व (डी) प्रभागातून असून सर्वात कमी १५ हरकती या वसई गाव (आय) प्रभागातून आल्या आहेत. बहुतांश हरकती या मतदाराचे नाव एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याविषयीच्या असल्याचे पालिकेने सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने वसई-विरार महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावर ३ जुलैपर्यंत हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानुसार पालिकेकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा एकूण पाच हजार आठ हरकती नोंदविण्यात आल्याचे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. नव्याने प्रभाग रचना केल्याने मतदारांची विभागणी करतानाच्या त्रुटी या हरकतींच्या माध्यमातून समोर आल्याचे दिसते. सर्वाधिक हरकती या मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याविषयीच्या आहेत. काही नावे महापालिकेच्या हद्दीबाहेर म्हणजेच ग्रामीण भागात गेल्याच्या हरकतीदेखील आहेत.

याबाबत बोलताना शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी सांगितले की, वसई पूर्व क्र.३६ प्रभागातून अनेक मतदारांची नावे गायब आहेत. त्यातील काही शोधण्यात यश आले, मात्र १२८ नावे कोणत्या यादीत आहेत, ते अजूनही सापडलेले नाही. दुसरीकडे नालासोपारा संतोष भुवन येथील अडीच हजार मतदार हे ३६ क्रमांकाच्या म्हणजेच वसईच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. याबाबत पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून ही नावे योग्य त्या प्रभागात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दाखल हरकतींचे निवारण करण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे. यासाठी पालिकेने प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले असून त्यांच्या पथकामार्फत आलेल्या हरकतींनुसार स्थळांची पाहणी करून योग्य त्या प्रभागात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे पालिका उपायुक्त डॉ. किशोर गवस यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत हे काम प्रभाग समिती स्तरावर करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम यादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.

प्रारूप मतदारयाद्यांनुसार संबंधित प्रभागातील मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली असेल, तर दाखल हरकतींनुसार ती योग्य प्रभागात समाविष्ट करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र नसलेली नावे मतदारयादीत समाविष्ट करणे हे पालिकेचे काम नसून मतदार नोंदणीचे काम हे उपजिल्हा अधिकाऱ्यांचे आहे.

अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

प्रभाग समिती हरकतींची संख्या

ए ३१३, बी ४९४, सी ६२, डी २९२३, ई ४२, एफ ५०९, जी ६२९, एच २१, आय १५

एकूण ५००८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *