फरिदाबादमध्ये जंगलात सापडली सूटकेस; श्रद्धा वालकर प्रकरणाशी कनेक्शन?

हरयाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात सुरजकुंड पाली रोड परिसरात एक सूटकेस आढळून आली आहे. रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर जंगलात सापडलेल्या सूटकेसमध्ये मानवी शरीराचे अवयव सापडले आहेत. या प्रकरणी फरीदाबाद पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आहे. सूटकेसमध्ये सापडलेले अवयव शवविच्छेदनासाठी पाठवले जाणार आहेत.

दिल्लीत घडलेलं श्रद्धा वालकर प्रकरण ताजं आहे. सहा महिन्यांपूर्वी आफताब पुनावालानं त्याची प्रेयसी श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे त्यानं महरौलीतील जंगल आणि परिसरात फेकले. श्रद्धाच्या मृतदेहाचे सर्व तुकडे पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळेच सूटकेसमध्ये अवयव सापडताच हरयाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. दिल्ली पोलिसांना डीएनए चाचणी करायची असल्यास अवयवांचे नमुने वेगळे ठेवण्यात येतील, अशी माहिती फरीदाबाद पोलिसांनी दिली.

सूटकेसमध्ये सापडलेले अवयव कमरेखालच्या भागातील आहेत. अवशेष एक महिन्यापूर्वीचे असल्याचं सांगण्यात येत आहे. अवशेष कुजलेले आहेत. त्यामुळे मृतदेह पुरुषाचा की महिलेचा हे ओळखणं कठीण आहे. शवविच्छेदनानंतरच या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. फरीदाबादमधील सूटकेसचा संबंध श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाशी असल्याची चर्चा सुरू आहे. सूटकेसमधील अवयव कोणाचे याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जंगल परिसर असल्यानं आसपास सीसीटीव्ही नाहीत. पाली आणि एमव्हीएन शाळेजवळ सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे पोलीस गेल्या दीड महिन्यांतील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. फॉरेन्सिक विभागामधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासातून सूटकेसमधील अवयव महिलेचं असल्याचं दिसतं. मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आहेत. सूटकेसमध्ये केवळ कमरेखालच्या भागाचे अवयव आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *