फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक

एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) मधील कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. २००९ ते २०१७ या काळात बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आज दिवसभर चाललेल्या चौकशीअंती ईडीने पांडेंना अटक केली.

संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरु केली होती. २००६ मध्ये पांडे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले, त्यावेळी त्यांनी आपली आई आणि मुलाला कंपनीचे संचालक केले. पांडेंच्या कंपनीला एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले.

सीबीआयच्या आरोपानुसार नारायण आणि रामकृष्ण, वाराणसी आणि हल्दीपूर यांनी २००९ ते २०१७ दरम्यान एनएसई कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचा कट रचला. ज्यासाठी त्यांनी २००१ मध्ये पांडे यांनी स्थापन केलेल्या ISEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कामावर ठेवले होते. कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगसाठी पांडेंच्या कंपनीला ४.४५ कोटी रुपये मिळाल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

एनएसई कर्मचाऱ्यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडी आणि सीबीआय यांनी पांडेंवर गुन्हा दाखल केला होता. सीबीआय आणि आता ईडीने पांडे आणि त्यांची दिल्लीस्थित कंपनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नारायण आणि रामकृष्ण, कार्यकारी उपाध्यक्ष रवी वाराणसी आणि प्रमुख महेश हल्दीपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चित्रा रामकृष्ण यांच्या काळात झालेला एनएसईतील गैरव्यवहार लेखापरीक्षणात का उघड झाला नाही, याची चौकशी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *