बोगस मतदारांना रोखण्यासाठी १ ऑगस्टपासून मतदार ओळखपत्र होणार आधारशी लिंक

निवडणूक आयोगानं एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी आहे का? हे तपासण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. १ ऑगस्टपासून राज्यात ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

प्रत्येक मतदार आणि त्याचं मत लोकशाहीत महत्त्वाचं आहे. मतदार यादीत दुबार नावं असणं, पत्ता अपूर्ण असणं यासारखे दोष आढळून येतात. त्याचबरोबर बोगस मतदानाचे प्रकारही घडत असतात.

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी २६ जुलैला सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली जाणार आहे, असं राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर कोणताही आधार क्रमांक पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं त्यांनी पुढे सांगितलं. सारखे फोटो असणारे फोटो शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केलं असून आतापर्यंत ४० लाख व्हेरिफिकेशन करण्यात आले आहेत. त्यापैकी २० लाख नावं बाद झाली आहेत.

१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेंतर्गत १ एप्रिल २०२३ पर्यंत आपला आधार क्रमांक लिंक करता येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष उपक्रम हाती घेतला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी पोर्टल आणि अॅपची सुविधा दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *