मंकी पॉक्सला घाबरू नका फक्त खबरदारी बाळगा…

मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो.

या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने आरोग्य विभागाने ”घाबरू नका…खबरदारी बाळगा…” असे आवाहन नागरिकांना केले आहे.

भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. ‘ऑर्थोपॉक्स व्हायरस’ या डी.एन.ए. प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार होतो. तसेच काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये विषाणू आढळून आल्यामुळे हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक वाहक आहेत.

आजाराची लक्षणे

  • ताप येणे, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथी) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णामध्ये आढळून येतात.
  • कुपोषण, कृमी प्रादुर्भाव अणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो.
  • या आजाराचा मृत्युदर सर्वसाधारणपणे ३ ते ६ टक्के आहे.

अधिशयन कालावधी

  • आजाराचा अधिशयन कालावधी ६ ते १३ दिवस किंवा ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्गजन्य कालावधी अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे बरे होईपर्यंत असतो.

असा होतो प्रसार

  • व्यक्ती-व्यक्तीमध्ये थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव
  • बाधित व्यक्तींनी वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होते.
  • बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

असा ओळखा संशयीत रुग्ण

  • गेल्या ३ आठवड्यात मंकी पॉक्स बाधित देशांमध्ये किंवा राज्यामध्ये प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये शरीरावर अचानक पुरळ उठणे, सूजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीला संशयित रुग्ण म्हणून ओळखले जाते.

असे होते निदान

प्रयोगशाळेत पी.सी.आर. चाचणी अथवा सिक्वेन्सिंगद्वारे या आजाराचे निदान केले जाते.

मंकी पॉक्स सर्वेक्षण

  • मंकी पॉक्सचा एक रुग्णदेखील साथरोगाचा उद्रेक असल्यास पुरक आहे. या रुग्णांचे रक्त, रक्तद्रव, फुटकळ्यातील द्रव आणि मुत्र हे नमुने संकलित करुन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थतेत पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येतात.

रुग्ण व्यवस्थापन आणि विलगीकरण

  • मंकी पॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवावे.
  • मास्कचा वापर करावा. कातडीवरील पुरळ, फोड नीट झाकण्यासाठी त्याने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पॅन्ट असा पोषाख वापरावा.
  • जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाही तो पर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे.

”नागरिकांनी घाबरुन जाऊ नये परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या वेळी ज्याप्रमाणे आपण नियमांचे पालन करीत होतो. त्याचप्रमाणे सर्वांनी नियमांचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकी पॉक्ससदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास जवळच्या आरोग्यकेंद्रात दाखल करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *