मराठी मालिका पाहणं बंद करा असं विक्रम गोखले का म्हणायचे?

सुविख्यात नाट्यदिग्दर्शक विजया मेहता यांच्या ‘स्कूल’ मधून ज्यांची जडणघडण झाली, अशा नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी अशा अनेक कलावंतांच्या मांदियाळीत विक्रम गोखले यांचे ठळकपणे नाव घ्यावे लागेल.

पुण्यामध्ये एक फार मोठी अशी समृद्ध नाट्यपरंपरा असून, बालगंधर्व, छोटा गंधर्व, वसंत शिंदे यांच्यापासून ते डॉ. जब्बार पटेल, मोहन आगाशे, मोहन गोखले, सतीश आळेकर अशा अनेकांचा उल्लेख करता येईल. अस्सल कलावंत हा तत्त्वज्ञ असला पाहिजे, असे ॲरिस्टॉटलने म्हटले होते. कोणत्याही नटाने अथांग आणि भरपूर वाचन केले पाहिजे, असे विक्रम गोखले यांचे स्पष्ट मत होते. अगदी मानसशास्त्राचा जरी विचार केला, तरी आपण फ्रॉइडपासून ते साधना कामत यांच्यापर्यंत विविध जाणत्यांची चार हजार पाने भरतील एवढी पृष्ठे वाचली असल्याचे ते सांगत. मानसशास्त्र हा विषय घेऊनच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि ते त्याचवेळी भरपूर व्यायामही करत.

व्यायाम करून त्यांनी उत्तम शरीरसंपदा संपादन केली होती. मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीत ज्यांना देखणेपण लाभले होते, अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये मास्टर विठ्ठल, चंद्रकांत मांढरे, विवेक, रवींद्र महाजनी यांचा उल्लेख करावा लागेल. अगदी अलीकडे विविध पुरस्कारप्राप्त अशा ‘गोदावरी’ या चित्रपटातदेखील विक्रम यांनी एका भ्रमिष्ट आजोबाचे अप्रतिम काम केले होते.

गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री, तर आजी कमलाबाई या पहिल्या बाल अभिनेत्री होत. कमलाबाईंनी दादासाहेब फाळके निर्मित ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाईंनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. दुर्गाबाई या नाटकांतही काम करत असत. तर कमलाबाईंनी नाटकातून पुरुषांच्या भूमिकाही केल्या होत्या. वडील चंद्रकांत गोखले यांनी दहा रुपये पगारावर, त्यांचे गुरू श्रीधर जोगळेकर आणि परशुरामपंत शाळिग्राम यांच्या रमेश नाटक कंपनीतून कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत संगीत मंडळीतही त्यांनी ‘भावबंधन’ वगैरें मधून नायकाची भूमिका केली.

‘नवयुग’ चित्रपट कंपनीत चंद्रकांत गोखले यांनी पुं‘डलीक’ हा चित्रपट करून (पगार 40 रुपये!) आपली चित्रपटांतील कारकीर्द सुरू केली. गरीब आणि दीनवाण्या वृद्ध पित्याच्या भूमिकेत ते नेहमी दिसत. खुद्द विक्रम यांच्या घराण्यात कलेचा वारसा असूनदेखील महाविद्यालयीन जीवनात असताना आपण अभिनयक्षेत्रात प्रवेश करावा, असे त्यांना कधी वाटले नव्हते. परंतु त्यांच्या आयुष्याला एक वळण मिळाले आणि त्यांनी अभिनय करकिर्दीस सुरुवात केली, ती बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या गाजलेल्या नाटकातून. मात्र रंगभूमीवरील हा कोल्हटकरी संप्रदाय बटबटीत, भावनात्मक, कौटुंबिक नाटकांचा आणि कृत्रिम अभिनयाचा होता.  अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसतानाही विक्रम यांनी त्यातील व्यक्तिरेखा विलक्षण सहजपणे निभावली.

या नाटकाचा एक प्रयोग बघून सुविख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू म्हणाले की, या संपूर्ण नाटकात केवळ विक्रमच अभिनय करत नाहीये… याचा अर्थ ‘जुडी’मधील केवळ विक्रम यांचा अभिनयच त्यांना वास्तवदर्शी वाटला होता. ‘मी कोणत्याही नाट्य शिबिरात प्रशिक्षण घेतले नाही. परंतु ‘जास्वंदी’ या विजया मेहता दिग्दर्शित नाटकात भूमिका करताना मला अभिनयाबद्दल बरेच काही शिकता आले’, असे विक्रम नेहमी म्हणत असत. पुढे 1977 साली ‘स्वामी’ मधील माधवरावांना, म्हणजेच विक्रम यांना आपला सूर सापडला, तो जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकात.

ज्याच्या घराण्यात वेडेपणाचा संचार आहे, अशा या बॅरिस्टरचे आगळे भावनिक जीवन विक्रम यांनी आपल्या चर्येतून, हातवाऱ्यांतून आणि शब्दाशब्दातून प्रेक्षकांसमोर उभे केले. त्यांनी ही भूमिका सर्वस्व पणाला लावून केली. ‘महासागर’ तसेच ‘कमला’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’, ‘संकेत मिलनाचा’, ‘नकळत सारे घडले’, ‘समोरच्या घरात’, ‘पुत्र मानवाचा’ ‘छुपे रुस्तुम’, ‘एखादी तरी स्मितरेषा’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’ ही विक्रम यांचा अभिनय असलेली लोकप्रिय नाटके. ‘मकरंद’ मधील विक्रम यांच्या कामाबद्दल या नाटकाचे नाटककार अरविंद औंधे नेहमी कौतुकाने बोलतात.

अगदी अलीकडील काळात ‘के दिल अभी  भरा नहीं’ हे नाटक प्रकृती बरी नसतानाही ते करत असत. अनेक वर्षांपूर्वी ‘द्विधाता’ या दूरचित्रवाणी मालिकेतील विक्रम यांची दुहेरी भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. त्या भूमिकांमधील मनोव्यापारांची गुंतागुंत वेधकपणे सादर करण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले होते.

कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित व अभिनीत ‘उडान’ या उत्कृष्ट टीव्ही मालिकेत आयपीएस बनलेल्या नायिकेच्या पित्याच्या भूमिकेत विक्रम होते. तर ‘अग्निहोत्र’ या मालिकेत मोरेश्वर अग्निहोत्रीची शीर्षक भूमिका त्यांनी केली होती. मराठी चित्रपटांचे नायक म्हणून विक्रम गोखले फारसे यशस्वी ठरले नसले, तरी गदिमा व द. मा. मिरासदार यांच्या भूमिका असलेल्या ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’ मध्ये विक्रम नायक होते. तसेच कळत नकळत, जोतिबाचा नवस, भिंगरी, लपंडाव, माहेरची साडी अशा मुख्य धारेतल्या चित्रपटांतही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

‘वासुदेव बळवंत फडके’ हाही त्यांचा एक महत्त्वाचा चित्रपट. वैद्यकीय क्षेत्रावरील ‘आघात’ हा एक उत्कृष्ट चित्रपट विक्रम यांनी दिग्दर्शितही केला होता. विक्रम आणि मुक्ता बर्वे या दोघांचाही त्यातील अभिनय एकापेक्षा एक सरस होता. व्यावसायिक हिंदी चित्रपटांत चरित्र भूमिका करण्यासाठी जे एक विशिष्ट ऐटबाज व्यक्तिमत्त्व लागते, ते विक्रम यांच्याकडे असल्यामुळे स्वर्ग नरक, यही है जिंदगी, तुम बिन, अकेला, अग्निपथ, खुदा गवाह ते अगदी हम दिल दे चुके सनम पर्यंत अनेक चित्रपटांत विक्रम गोखले शोभून दिसले.

‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटीतील गणपतराव बेलवलकरांचे मित्र रामभाऊ अभ्यंकर ही भूमिका निभावताना, रागाच्या भरात रामभाऊ आपल्या मित्राला कानशिलात लगावतात आणि ‘तू नट म्हणून भिकारडा आहेस, पण माणूस म्हणूनसुद्धा नीच आहेस’, असे सुनावतात, तया प्रसंगात विक्रम यांची अभिनेता म्हणून ताकद दिसून येते.

प्रख्यात प्राणिशास्त्रज्ञ डेस्मंड मॉरिस याची अनेक पुस्तके वाचल्यानंतर विक्रम यांना अभिनयाबद्दल आणखीनच प्रगल्भ भान आले. प्राणी असो वा मनुष्यप्राणी. तो मुळातच एक उत्तम अभिनेता असतो. त्याची प्रत्येक शारीरिक हालचाल हा अभिनयच असतो, हे आपल्याला प्राण्यांच्या व माणसांच्या हालचालीमधून कसे दिसते, याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करण्याची सवय विक्रम यांना होती. दिग्दर्शकाने अमूर्त ठिकाणाहून तमुक ठिकाणी जा, थांब, मग वळ, असे संगितले असले तरी त्यामागील कारणमीमांसा जाणून घेऊन, त्यानुसार अभिनय करण्याचे तंत्र विक्रम यांनी अवगत करून घेतले होते. लेखकाने लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या जागा भरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. विक्रम गोखले यांची नजर धारदार आणि तीक्ष्ण होती. केवळ रंगभूमी वा पडद्यावरील त्यांचे अस्तित्वच त्या अवकाशाला एक वजन व वलय प्राप्त करून देत असे. मात्र उत्तम वाचन असलेल्या विक्रम यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका इतक्या वादग्रस्त होत्या की, त्यांचे असे का झाले, असा प्रश्न पडत असे.

भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असून, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बेजबाबदार विधानाचे समर्थन विक्रम यांनी केले होते. ज्या योध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मोठ्या नेत्यांनी केला नाही. आपले लोक ब्रिटिशांविरुद्ध लढत आहेत, हे पाहूनही त्यांनी वाचवले नाही, असे मत विक्रम यांनी व्यक्त केले. मात्र शहीद भगतसिंग यंना फाशीपासून वाचवण्यासाठी गांधी-नेहरूंनी कोणते प्रयत्न केले, याची विक्रम यांना माहिती नसावी. गांधी-नेहरू व स्वातंत्र्य चळवळीत ऐतिहासिक भूमिका बजावणाऱ्या अन्य नेत्यांचा विक्रम यांच्यासारख्या हिंदुत्ववाद्याने कधी गौरवाने उल्लेख केला नाही. उलट ब्रिटिशांशी हातमिळवणी करणाऱ्या किंवा त्यांना अप्रत्यक्ष साह्य करणाऱ्या वा स्वातंत्र्य आंदोलनाशी सुतराम संबंध नसणाऱ्या नेत्यांचे मात्र ते उदात्तीकरण करत राहिले. जे सत्तर वर्षातं झाले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे वक्तव्य करताना, नेहरूंनी या देशात आधुनिक ज्ञानविज्ञानाचा व उद्योगांचा कसा पाया घातला, याबद्दलचा इतिहास विक्रम यांना माहीत नसावा, असे त्यांच्या बोलण्यावरून दिसले.

‘हा देश कधीही हिरवा होणार नाही, तो भगवाच राहिला पाहिजे’, असे म्हणताना विक्रम हे हिंदुराष्ट्राचाच पुरस्कार करत होते. एकीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे व्यक्तिमत्त्व होते असे म्हणायचे आणि दुसरीकडे या देशातील संविधानाचा पुरस्कार करण्याऐवजी हिंदुराष्ट्राचा जयजयकार करायचा, अशी त्यांची परस्परविरोधी भूमिका होती. या देशाचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत, असे म्हणणाऱ्यांना गोळ्या घाला, असेही विक्रम गोखले उद्वेगाने म्हणाले होते. परंतु या देशाच्या घटनेविरोधात जाणाऱ्या आणि धर्मांधता जोपासणाऱ्यांच्या विरोधात विक्रम यांनी कधीही आक्रमक भाषा केली नाही.

अर्थात लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्यात आले ते चूक झाले, तसेच भाजपच्या नेत्यांनी तोंडाला आणि वागणुकीला लगाम घालावा, नोटाबंदीसाठी घाई करण्यात आली, बुलेट ट्रेन हा आपल्या देशाचा अग्रक्रम नाही, राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी ऐकण्यासारखी असतात, गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यांचे समर्थन होऊ शकत नाही, अशा प्रकारची मतेही व्यक्त करून, आपल्याला एकाच चष्म्यातून बघता येणार नाही असेही एक प्रकारे विक्रम गोखले सुचवत असावेत. सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर, भारताने तेथे प्रत्यक्षात किती माणसे मारली असे विचारणाऱ्यास देशद्रोही म्हणणे चूक आहे, असेही विक्रम म्हणाले होते. या हल्ल्यांचे राजकीय भांडवल करणे, हे त्यांना पसंत नव्हते. अक्षयकुमारने मोदी यांची मुलाखत घेतली आणि ती अराजकीय असल्याचा दावा करण्यात आला. तेव्हा, जर ती अराजकीय असेल, तर ती पुन्हा पुन्हा का दाखवण्यात आली, असा सवाल विक्रम यांनी विचारला होता.

शरद पवार यांनी बारामतीसारखा महाराष्ट्राचा विकास का केला नाही, अशा प्रश्नही त्यांनी विचारला होता. मुसलमानांना पाकिस्तानात पाठवा, हे वडिलांचे मत आपल्याला कधीच मान्य नव्हते, असे उद्गार विक्रम यांनी काढले होते. मात्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्या झाल्याबद्दल आपले मत काय, असे विचारले असता, पूर्वी कधीही अशा हत्या झाल्याच नाहीत आणि सत्तेतील लोकांनी त्या केल्या याचा पुरावा आहे का? असे प्रतिप्रश्न विचारून, विक्रम गोखले यांनी आपण कोणत्या बाजूचे आहोत, हे दाखवून दिले होते.

‘वजीर’ या मराठी चित्रपटात विक्रम गोखले यांनी भूमिका केली होती, पण तो चित्रपट फालतू असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. काशिनाथ घाणेकरचा अभिनय हा अभिनयच नव्हता, असे म्हणण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. दर्जाहीन मालिका पाहणे बंद करा, असे मत त्यांनी व्यक्त केले, तेव्हा तुम्हीही काही भूमिका पैशासाठी केल्या होत्या, याची आठवण त्यांना कलाक्षेत्रातील इतरांनी करून दिली होती. विक्रम गोखले हे सूक्ष्म किंवा सटल अभिनय करणारे उच्च दर्जाचे अभिनेते होते. मात्र नाटक-सिनेमातून त्यांच्या गुणांचा जेवढा उपयोग करून जायला हवा होता, तेवढा तो केला गेला नाही. डॉ. लागू यांनाही हिंदी चित्रपटांत कसदार भूमिका अत्यल्पच मिळाल्या.

विक्रम यांचे वाचन उत्तम असले, तरी माणूस काय वाचतो आणि वाचनातून काय घेतो, हे महत्त्वाचे असते. विक्रम गोखले हे हिंदी चित्रपटसृष्टीत वावरले असले, तरी त्याचे विचारविश्व हे पारंपरिक आणि पुणेरीच रहिले. विजय तेंडुलकरांसारख्यांच्या सहवासात राहूनही, त्यांच्यातला कट्टरपणा फारसा कमी झाला नाही. नाट्य-चित्रपटसृष्टीत आर्यन पिल्म कंपनीचे नानासाहेब सरपोतदार, भालजी पेंढारकर किंवा मास्टर दीनानाथ मंगेशकर घराणे यांच्यावर हिंदुत्ववादाचा, सावरकरी विचारांचा आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेल्या इतिहासाचा मोठा पगडा होता. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू सदाशिव अमरापूरकर, अमोल पालेकर किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यावर (नाना पाटेकर हे फ्लेक्झिबल विचारांचे पुरस्कर्ते आहेत!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *