माफ करा…मी असभ्यच आहे;  हर्षवर्धन जाधव संतापले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजत प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वादंग सुरू आहे. याच मुद्द्यावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवराळ भाषेचा वापर करत भाजपवर टीका करणारा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जाधव यांना चांगलेच ट्रोल केले. या पार्श्वभूमीवर भडकलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा चहाच्या हॉटेलमधूनच आणखी एक व्हिडिओ बनवत ‘मला क्षमा करा, मी असभ्यच आहे. महाराजांच्या अपमान सहन करून तुम्ही सभ्य राहा,’ असा पलटवार जाधव यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवराय हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असं वक्तव्य केलं होतं. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलताना भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाला पत्र लिहिली, असं म्हटलं. या दोघांच्या वक्तव्याने मोठ वाद निर्माण झाला. राज्यभरात निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, एका व्हिडिओच्या माध्यमातून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंदची हाक दिली होती. बंदचे आवाहन करत असताना जाधव यांनी भाजप आणि राज्यपालांविरोधात शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्यानंतर माजी लोकप्रतिनिधीने अशी भाषा वापरणे योग्य नाही, ही सभ्य भाषा नाही, अशा प्रकारच्या कमेंट करत भाजप कार्यकर्त्यांनी जाधव यांना ट्रोल केले होते. यामुळे भडकलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी एका चहाच्या हॉटेलमध्ये बसून व्हिडिओ बनवत मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, माझ्यामुळे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले, अशी टीका भाजपवाले करत आहेत. मात्र राज्यपाल आणि भाजपचे नेते जशी भाषा वापरत आहेत, ती भाषा जलील देखील वापरत नाहीत, असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *