
सौदी अरेबियाचे पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांचे कडवे टीकाकार असलेले आणि अमेरिकेत निर्वासित म्हणून राहणारे सौदी पत्रकार जमाल खगोशी यांची चार वर्षांपूर्वी तुर्कीची राजधानी इस्तंबुलमध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणात तत्कालीन उपपंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याविरोधात अमेरिकेच्या कोलंबिया शहरात एका कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. परंतु सप्टेंबर २०२२ मध्ये मोहम्मद बिन सलमान यांना बढती देऊन पंतप्रधान करण्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असेपर्यंत त्यांना या खटल्यापासून संरक्षण प्राप्त झाले असल्याचे अमेरिका सरकारने नुकतेच जाहीर केले होते. याबाबत पत्रकारांशी बोलताना वेदांत पटेल यांनी काल, गुरूवारी एक वक्तव्य केले होते. ‘अशाप्रकारे यापूर्वी मोदींसह अनेक राष्ट्र्रप्रमुखांना संरक्षण देण्यात आलेले आहे’, असं वक्तव्य पटेल यांनी काल, गुरूवारी केले होते. पटेल यांच्या या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘मोदींबाबत प्रतिक्रिया कितपत योग्य, सुसंगत आणि परिस्थितीनुरूप होती, हे आपल्याला कळलेले नाही. दोन्ही देशांमधले संबंध उत्तम असून दिवसेंदिवस ते अधिक दृढ होत चालले आहे. ते अधिक घट्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, असं बागची यांनी पत्रकारांना सांगितले.