राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदार आहेत. या बंडखोरीमुळे शिवसेनेचं आतापर्यंत खूप मोठं राजकीय नुकसान झालं आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दणका देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आता शिव संवाद यात्रेची घोषणा केली आहे. हा दौरा एकूण ३ दिवसांचा असणार आहे. आदित्य या ३ दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पिंजून काढणार आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र दौऱ्याचंही नियोजन करणार आहेत.
शिव संवाद यात्रेची सुरुवात ही २१ जुलैपासून होणार आहे. हि यात्रा भिवंडीतून निघणार असून, भिवंडी-नाशिक-दिंडोरी-संभाजीनगर आणि शिर्डी हि ठिकाणे घेणार आहेत.
या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांचा बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न असणार आहे. आदित्य ठाकरे यांनी याआधी मुंबईत अशा प्रकारे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. त्यामुळे ठाकरे पितापुत्रांच्या या प्रयत्नांना यश येणार की अशाच प्रकारे गळती सुरुच राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.