वर्सोवा पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; २० फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येत असलेल्या नवीन वर्सोवा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या पुलाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही जलदगतीने पूर्ण करून २० फेब्रुवारी रोजी हा पूल वाहतुकीला खुला केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हा मुंबई, ठाणे, वसईला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे.  दररोज या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहनांची वाढती संख्या व जुन्या पुलाची होत असलेली दुरवस्था  लक्षात घेऊन जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहे.

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आले होते मात्र संथ गतीने सुरु असलेल्या या कामाला ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढही  देण्यात आली होती. त्यातच दोन वर्षे करोनाचे संकट उद्भवले आणि या पुलाचे काम आणखीनच लांबणीवर पडले होते. मात्र आता मुंबई- वसई या दोन्ही दिशांकडील पुलाचे काम जोरात सुरू असून आतापर्यंत या पुलाचे ८३ टक्के इतके काम पूर्ण झाले असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्या भाईंदर खाडीवर असलेल्या जुन्या वर्सोवा पुलावरूनच वाहनांची  ये-जा सुरू आहे. वाढते नागरीकरण यामुळे दिवसेंदिवस या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी व नवीन पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पुलावर जाऊन कामाचा आढावा घेतला आहे. या वेळी पुलाच्या कामाला गती दिली असून येत्या २० फेब्रुवारीपर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण करून पूल हा वाहतुकीला खुला केला जाईल, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *