वविशमपाचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक

वसई विरार महानगरपालिकेचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून ते स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपींकडून ४ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मनपाचे कचरा वाहणारे ट्रक चोरीला जाण्याच्या घटना मागील दोन महिन्यात घडत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी वेगवेगळी पथके तयार करून ट्रक चोरी झालेल्या गुन्ह्याच्या घटना स्थळांना भेटी देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मिळालेल्या आरोपीच्या फोटो व माहितीनुसार आरोपी वैजनाथ लांडगे (६५), जहीर शेख (४०) आणि मुजीब शेख (४०) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर ट्रक चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या तिन्ही आरोपींकडून वसई २ आणि आचोळे २ असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपींनी चोरलेल्या चार डंपर पैकी १ डंपर आणि इतर ३ डंपर तोडून त्याचे पार्ट वेगळे काढून ते स्क्रॅपमध्ये विक्री केल्याचे सांगितले. तपास पथकाने तीन डंपरचे इंजिन, क्लचप्लेट, गिअर बॉक्स आणि डिस्कसह टायर असा एकूण ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी वैजनाथ लांडगे याच्या विरोधात नवी मुंबई आणि परभणी येथेही चोरीचे गुन्हे नोंद आहेत. तिन्ही आरोपी बाबत माहिती मिळाल्यावर परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. चार गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *