वसई विरारमध्ये पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद!

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे एकीकडे दुथडी भरून वाहत असताना दुसरीकडे विजेअभावी शहराचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद पडला आहे. त्यामुळे धरणात पुरेसे पाणी असतानाही नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांचे भर पावसात पाण्यासाठी हाल होत आहेत.

वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणावर लपंडाव सुरू आहे. पालघर तालुक्यात मासवण येथे सूर्या नदीकिनारी वसई-विरारला पाणी पुरविणारे पाणी उचल केंद्र आहे. तर धुकटन येथे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. सूर्या नदीवरील धरणातून वसई-विरारला सूर्या टप्पा २ आणि टप्पा ३ या दोन्ही प्रकल्पांतून नियमित २०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र मुसळधार पावसामुळे मासवण व धुकटण येथे ११ जुलैपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. बुधवार आणि गुरुवारी तर वीजपुरवठा पूर्णपणे बंद होता. विजेअभावी पाण्याची उचल आणि जलशुद्धीकरण शक्य नसल्याने सूर्या योजनेतून वसई विरार शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाडाचा शोध सुरू असून गुरुवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता. त्यामुळे यापुढे अनिश्चित काळापर्यंत शहरास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे वसई-विरार महापालिकेने जाहीर केले आहे. विद्युत वितरण कंपनीचे व महापालिकेचे अभियंते कार्यस्थळी उपस्थित असून वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सूर्या योजनेतून शहरास पाणीपुरवठा सुरू होईल, मात्र पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन वसई-विरार पालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *