वसई-विरार महापालिका हद्दीत दररोज सरासरी ४८ जणांना श्वानदंश;
वसई-विरार महापालिका हद्दीत चालू वर्षात १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर दरम्यान थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल १५ हजार ७४७ जणांना श्वानदंश झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान हा आकडा १८ हजारांच्या घरात होता. वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशाच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी समोर येत आहे.

वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव कमालीचा वाढला आहे. शहरात जवळपास ७० हजारांहून अधिक भटके कुत्रे असून त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई गाव तसेच वसईच्या पश्चिम पट्ट्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. नाक्या-नाक्यावर कुत्र्यांची टोळकी उभी असतात. अनेकदा ही टोळकी दुचाकीच्या मागे लागत असल्याने अपघातही घडत आहेत. लहानमोठ्यांवर भुंकत धावून जाणाऱ्या कुत्र्यांमुळे वसई तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. कुत्र्यांना मागे येण्यापासून रोखल्यास किंवा त्यांच्या तावडीत सापडल्यास श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. पालिका रुग्णालय, आरोग्य केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात श्वानदंशाचे रुग्ण येत असतात. यावरून, चालू वर्षात २३ नोव्हेंबरपर्यंत कुत्रे चावल्याच्या एकूण १५ हजार ७४७ घटना घडल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घडल्या आहेत.

पालिका हद्दीतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे आणि पालिकेचे तुळींज रुग्णालय आणि डी. एम. पेटिट रुग्णालय येथे श्वानदंशाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. या ठिकाणी आलेल्या रुग्णांच्या संख्येवरून ही आकडेवारी पालिकेने दिली आहे. यामध्ये तुळींज रुग्णालयात आलेल्या श्वानदंशाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी ‘श्वान निर्बिजीकरण केंद्रां’ची आवश्यकता असताना फक्त एकच निर्बिजीकरण केंद्र अस्तित्वात आहे. त्यातच या ठिकाणचे कामदेखील संथगतीने सुरू असल्याने श्वानांची संख्या वाढत आहे.

भटके कुत्रे टोळक्यांनी रस्त्यावर फिरत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला कायमच दहशतीखाली असतात. रात्री उशिरा घरी परतणाऱ्यांनाही त्यांची भीती असतेच. शिवाय सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या पाठीही कुत्रे लागत असतात. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघटना व इतर संघटना यांच्यासह स्थानिकांनी केली आहे. शहरात श्वान दंशाच्या घटना वाढल्याने नागरिकांतून भीती व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षभरात १८ हजार जणांना श्वानदंश झाला होता.

वसई-विरार महापालिका हद्दीत श्वानदंश झाल्यास पालिकेच्या २१ प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच पालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. या शिवाय रेबीज लशींचादेखील पुरेसा साठा पालिकेकडे आहे. श्वानदंशाच्या रुग्णांवर वेळीच उपचार केले जात आहेत. – डॉ. भक्ती चौधरी , प्रभारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वसई-विरार महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *