
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आढळराव पाटीलच काय अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं विधान केलं होतं. त्यावर अमोल कोल्हे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, राजकीयदृष्ट्या त्यांच्या विधानात काही गैर नाही, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तसेच, वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचे हे आम्ही ठरवत असतो, असंही कोल्हे यांनी सांगितलं. अमोल कोल्हे यांचं हे सूचक विधान आणि भाजपने आतापासूनच शिरूर मतदारसंघात सुरू केलेले दौरे यामुळे अमोल कोल्हे भाजप सोडण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
भाजपाला आपली सत्ता टिकविण्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसणं यात राजकीयदृष्ट्या चुकीचं नाही. 2014 मध्ये येथील मतदारांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला शिरूर लोकसभेतून मोठ्या विश्वासाने संसदेत पाठविले. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली. मतदारांचा विश्वास असाच टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असं ते म्हणाले.
निवडणुका खूप लांब आहेत. आताच पक्षांतर, नाराजी आदी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आकारण त्याविषयी काहीतरी बातम्या पेरत राहणं किंवा त्याविषयी चर्चा करणं मला अनाठायी वाटतं. निवडणूक हे माध्यम आहे, तर सत्ता हे साधन आहे. साध्य आहे ते आपल्या मतदारांचा विश्वास सार्थ ठेवण्याचं. विकासाची वाट धरून लोक कल्याणाची कामे करण्याचं. तोच प्रयत्न मी करत राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.