शिंदे-फडणवीसांचा त्याग अन् तरुणांचे भोग; रोहित पवार

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला. येत्या पाच वर्षांत २० लाख तरुणांना नोकरी आणि रोजगार देण्याची घोषणा त्यामध्ये करण्यात आली आहे. यावरून भाजपवर निशाणा साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातून पळवलेल्या प्रकल्पांकडे लक्ष वेधलं आहे. या प्रकल्पांच्या आधारेच गुजरातमध्ये नोकऱ्या देण्याची घोषणा करण्यात येत असल्याचे सांगून त्याचे आकडेही रोहित पवार यांनी नमूद केले आहेत.

भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. त्यातील रोजगार निर्मितीच्या आश्वासनासंबंधी रोहित पवार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगातील नोकऱ्यांच्या बळावर २० लाख नोकऱ्या देण्याचा गुजरात भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे.

  • वेदांता-फॉक्सकॉन (पुणे) – २ लाख,
  • बल्कड्रग पार्क (रायगड) – १ लाख,
  • टाटा एअरबस (नागपूर) – १० हजार,
  • आयएफएससी सेंटर (मुंबई) – २ लाख,

याशिवाय मरीन पोलीस अकादमी (पालघर), केंद्रीय कामगार कल्याण मंडळ व राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था (नागपूर), मुंबई विमानतळ मुख्यालय, हिरे व्यापार, जहाज बांधणी कारखाना अशी ही यादी खूप लांबलचक आहे,’ असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे

‘गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने केला ‘त्याग’ आणि इथल्या युवांच्या वाट्याला आले भोग,’ असंच यानिमित्ताने म्हणावं लागेल, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी गोटातून रोहित पवार यांना काही प्रत्युत्तर दिलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *