
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन गेली २ दिवस वातावरण तापलेलं आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर ते अचानक नाशिकच्या मीरगावात एका ज्योतिषाकडून भविष्य पाहायला गेल्याची चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणावर आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकार मिंधं आहे. त्यामुळे कर्नाटक आणि गुजरातचे महाराष्ट्रावर हल्ले सुरु आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेणं गरजेचं असताना दोघेही गप्प आहेत. पण ते जरी गप्प असले तरी शिवसेना लढेल, असं संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्रात अत्यंत दुर्बल आणि कमजोर सरकार अस्तित्वात आलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. तर गुजरातने महाराष्ट्रतील उद्योग पळवले. महाराष्ट्रातली गावं हडप करण्याचा कर्नाटककडून प्रयत्न सुरु आहे. पण कानड्यांच्या जोरजुलूमाला आम्ही भीक घालणार नाही. हा इशारा समजा किंवा उघड धमकी.. पण आम्ही कानड्यांच्याविरोधात लढत राहू..”, असा आक्रमक पवित्रा राऊतांनी घेतला.
“सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचे, सरकार मिंधे असेल, पण आजही शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावू. रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू. १०६ हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलंय. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे, आम्हीही भोगू. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देतोय”, असंही राऊत म्हणाले.
आधी मंत्रिमंडळ बैठली रद्द केली, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीत दाखल झाले. हेलिकॉप्टरने शिर्डीत पोहोचताच त्यांनी साईंचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांना मुंबईकडे रवाना होणं अपेक्षित होतं. मात्र असं न होता मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट सिन्नरच्या दिशेने रवाना होत मिरगावच्या शिवारात पोहोचला. अचानक वळलेल्या ताफ्यामुळे पोलिसांची सुद्धा दमछाक झाली. यानंतर शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य… फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र… अंद्धश्रद्धेच्या पीकाचा नायनाट करण्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी उभी हयात घालवली. धर्माच्या ठेकेदारांनी त्यांचा खून पाडला पण तरीही त्यांची पुढची पिढी अंद्धश्रद्धेविरोधी लढते आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र सरकारने अंद्धश्रद्धे निर्मूलनाचा कायदा केला. पण राज्याच्या प्रमुख पदावर बसलेली व्यक्तीच जर ज्योतिष बघत असेल, एखाद्या मांत्रिकाला हात दाखवत असेल तर राज्याने काय आदर्श घ्यायचा? असे सवाल अंद्धश्रद्धा निर्मूलन समिती विचारते आहे.