
सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रिय याला गुरुवारी नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
‘झुंड’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा सहकलाकार प्रियांशू क्षत्रिय याला पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली आहे. नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांनी तक्रार दिली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील राहत्या घरातून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला पकडले होते. त्याने या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा केला. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी प्रियांशूला अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.