
डहाणूमधील वडकून येथल्या केशवी राम माच्छी या दोन वर्षे दहा महिन्याच्या चिमुकलीनं केवळ ११ तासांत १७ कि.मी.ची भीमाशंकर गडाची चढाई पूर्ण केली.
डहाणूतील गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपने भीमाशंकर गडावर ट्रेकिंगचं आयोजन केलं होतं. या ग्रुपसोबत वडकून खेतीपाडा येथील आनंद माच्छी, पत्नी, बहीण व दोन वर्षाची केशवी
हे देखील दाखल झाले.
केशवीच्या लहान वयाचा विचार करता ती भीमाशंकर गडाची चढाई करेल का? असा प्रश्न गडप्रेमी ग्रुप आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनात होताच. सकाळी साडेदहा वाजता केशवीनं खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईला सुरुवात केली. गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपसोबत केशवीही चालत निघाली. या गडावर चढाईसाठी पायऱ्या नसल्यानं काका, काकूचा तर कधी आत्या आणि बहिणीचा हात धरून ती चालू लागली. या प्रवासात केशवीला तिच्या कुटुंबीयांनी तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर गडावरील, हिरवी झाडे, छोटे धबधबे, पक्षी, माकड, पाहून जणू भूरळ पडल्याप्रमाणे ती शिखराकडे मार्गक्रमन करत होती. छोट्या चिमुरडीचा मोठा पराक्रम, धाडस आणि उत्साह पाहून सर्वांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु होता.
छोट्या केशवीचं धाडस आणि उत्साहपाहून त्यांच्याकडून कौतुक सुरू होतं. त्यामुळे तिचा उत्साह वाढल्यानं कोणीही कुरबूर अथवा मदत न घेता गणेश घाटाच्या मार्गानं बारा वाजल्याच्या सुमारास केशवीनं ८. ७० किमी चढाई पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा दीड वाजता परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतरही ती स्वतः हून पुढे आली. तिचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गडाचा पायथा गाठताना ती थकली. मात्र, गडप्रेमी ग्रुपनं तिला प्रोत्साहित केल्यानं साडेसहाच्या सुमारास तिनं एकटीनं यशस्वीरीत्या भीमाशंकर गडाचं ट्रेकिंग पूर्ण केलं. केशवीला गडावर चढाई करण्यासाठी सहा तास तर परत येण्यासाठी 5 तास तीस मिनिटं लागली. तब्बल 17 कि.मीचा ट्रेक पूर्ण करण्यासाठी केशवीला अकरा तास तीस मिनिटांचा कालावधी लागला आहे.
या ट्रेक मध्ये ६२ लोक सहभागी झाले होते. यामध्ये केशवी राम माच्छी ही सर्वात लहान वयाची होती. केशवीच्या याच धाडसाची नोंद आता इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.